औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा सर्वर डाऊन झाल्याने मंगळवारी विस्कळीत झाली. त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह रजिस्ट्री ऑफिस, उपविभागीय आणि तहसील कार्यालयालाही सर्व्हर डाऊन झाल्याचा फटका बसला.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन यंत्रणेत अडथळे येत आहेत. आज सकाळी अकरा वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा विस्कळीत झाली. त्यामुळे कार्यालयातील संगणक ठप्प पडले होते. तर सेतू सुविधा केंद्र, रजिस्ट्री कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शासकीय कार्यालय आता ऑनलाईन यंत्रणेने जोडली गेली आहेत. सर्वसामान्यांच्या तक्रारी, निवेदने यासह प्रशासकीय कामकाज ऑनलाइन करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयात शंभर टक्के ऑनलाईन झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र मुंबईतील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने कामकाजात व्यत्यय येत असल्याचे दिसते. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता यंत्रणा खूपच हळू सुरू आहे.ऑनलाइन यंत्रणा लवकरच सुरळीत होईल, असा दावा त्यांनी केला.